महाराष्ट्र राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनात कार्यरत अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करूनही त्यांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे ३ एप्रिल रोजी तंत्रनिकेतनातील कर्मचारी काळी फीत लावून शासनाच्या दिरंगाईबाबतचा निषेध व्यक्त करणार आहेत. त्यानंतरही मागण्यांची पूर्तता न झाल्यास ६ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या कामावर आणि स्वायत्त संस्थेतील परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
पात्र अधिव्याख्यात्यांना २००७च्या बैठकीच्या निर्णयानुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रदान करणे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जाहीर केल्याप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करणे, १३ वर्षांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती अधिव्याख्यात्यांना प्रदान करणे, संघटनेस शासन मान्यता देणे, संवर्ग विभाजनाचा शासन निर्णय रद्द करणे, विभाग प्रमुख व प्राचार्य पदाच्या मुलाखतीसाठी असलेली वयाची अट शिथिल करणे, मंत्रालयाच्या तंत्रशिक्षण विभागातील सहसचिव हे पद पुन्हा निर्माण करणे, शासकीय तंत्रनिकेतनातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंबंधी शासननिर्णय काढताना संघटनेला विश्वासात घेणे, कार्यरत अधिकाऱांची एकत्रित ज्येष्ठता सूची जाहीर करणे या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी शासनातील संबंधित व्यक्तींशी चर्चा केलेली आहे. पण मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही पूर्तता केली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळेच आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याचे महाराष्ट्र गव्हर्न्मेंट टीचर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे कळविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा